Contact

Please convey your suggestions and advice using the following form.

अक्षयवारी - Akshaywari
*अनुभवे आले अंगा*
*ते या जगा देतसे*
आज ज्येष्ठ शु दशमी,
पू रा द तथा गुरुदेव रानडे
(१८८६ ते १९५७) निंबाळ यांची पुण्यतिथी!
अगदी लहान वयात १६ व्या वर्षी त्यांना पू भाऊसाहेब महाराज उमदीकर यांचेकडून अनुग्रह मिळाला.त्यावेळी नुकतीच त्यांनी शालांत परीक्षा दिली होती. मुळातच बुध्दी तल्लख असणाऱ्या रामभाऊंना पहिली जगन्नाथ शंकर शेठ संस्कृत शिष्यवृत्ती मिळाली होती,हे गुरूंनी दिलेल्या नामाचे व नेमाचे फळ आहे ही श्रद्धा दृढ झाली. श्रध्देचा प्रवास सकामतेकडून निष्कामतेकडे झाला पाहिजे असे ते म्हणत.
पुढील शिक्षण पुणे येथे घेऊन १९१४ मध्ये ते एमए तत्वज्ञान पहिल्या वर्गात सुवर्ण पदक प्राप्त करीत उत्तीर्ण झाले. मराठी,इंग्रजी, कानडी, हिंदी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
अनेक व्यक्तिगत अडचणी गुरुकृपेचे बळावर झेलत त्यांच्या यशाची कमान चढती राहिली. सांगली,पुणे,अलाहाबाद येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी देशविदेशात लौकिक मिळवला. तत्वज्ञान अनुभवाच्या कसोटीवर उतरले पाहिजे आणि हेच संतांनी सिद्ध केले आहे हे त्यांचे प्रतिपादन होते.१९२६ ला प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पहिल्या उपनिषदरहस्य ग्रंथापासून ते १९५६ ला जमखंडी येथील त्यांच्या अमृत महोत्सवात प्रसिद्ध झालेल्या ग्रंथापर्यंत अध्यात्म, साक्षात्कार, गुरुकृपा, नेमसाधना आणि तत्वज्ञान ही पंचसूत्री त्यांचे जीवन धन्यता आणि उपदेश प्रदान करणारी अधिष्ठात्री ठरली.१९३२ मध्ये त्यांचा *मराठी संतांचा साक्षात्कार* हा ग्रंथ प्रसिद्ध झाला,आपल्या तत्वज्ञानाला त्यांनी *Rational Mysticism* म्हणून संबोधिले होते.
*अनुभवे आले अंगा*
*ते या जगा देतसे*
तसेच
*सेवितो हा रस*
*वाटितो आणिकां*
हेच कार्य गुरुआज्ञा मानून त्यांनी अंगीकारले.
१९२३ पासून निंबाळ हे त्यांनी साधनास्थळ मानून निश्चित केले आणि सर्व साधकांची आज ती *पारमार्थिक राजधानी* आहे.
गुरुदेवांची तब्येत फारशी ठीक नसे त्यातून वडील,आई,पहिली पत्नी,दोन लहान मुले ह्यांच्या वियोगाने दुःख झाले तरी व्यतीथ न होता त्यांचे थोरपण बावनकशी सोन्याप्रमाणे उजळून निघाले.
*माळीये जेऊते नेले*
*तेऊते निवांतचि गेले*
*तया पाणिया ऐसे केले*
*होआवे गा*
श्री ज्ञानेश्वरी १२.१२०
ह्या बोधावर ते ठाम होते.
अलाहाबाद विद्यापीठाचे उपकुलगुरूपद,डॉ राधाकृष्णन, सर गंगानाथ झा आदी नामवंतांचे मैत्रीचा लाभ, नित्यनेमनाम साधनेचे अधिकारी पद,प्रगल्भ तत्वज्ञान भाष्यकार ही सर्व विशेषणे प्राप्त असणारे पू गुरुदेव आपले गुरूंचे आठवणीने भावूक होत,एखादे गुरुभक्तीचे पद ऐकताना त्यांचे अष्टसात्विक भाव जागे होत,हीच ज्ञानीभक्तांची लक्षणे त्यांचे ठायी विलसत होती.
*जेंव्हा कापूर जळो सरे*
*तयाचि नाम अग्नी पुरे*
*मग उभयातीत उरे*
*आकाश जेवी*
श्रीज्ञानेश्वरी १८.१२११
गुरुतत्वाशी पर्यायाने ईश्वर स्वरूपाशी एकरूपता गुरुदेवांनी सिद्ध केली होती.
आज पुण्यतिथी दिनी, ज्ञानभक्तीचा कळस शोभणारे श्रेष्ठ गुरुभक्त,
पू गुरुदेव रानडे ह्यांना
सन्मानपूर्वक दंडवत!
साभार - संजीव प्र कुसूरकर,पुणे

#अक्षयवारी - ८४५१८२२७७२